लंडन: फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनच्या कोर्टातील खटला 11 मे पासून सुरू होणार आहे. पाच दिवस चालणारी ही सुनावणी दूरस्थ पद्धतीने चालवली जाणार आहे. पंजाब नॅशनल बॅंकेतील 2 अब्ज रुपयांच्या गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी नीरव मोदीला भारतात परत आणण्याची प्रक्रिया भारताच्यावतीने सुरू केली आहे. त्याला नीरव मोदीने आव्हान दिले आहे.
गेल्या वर्षी अटक झाल्यापासून नीरव मोदीला दक्षिण-पश्चिमेकडील वन्डस्वर्थ तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेले आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये सोशल डिस्टन्सिंग लागू आहे. त्यामुळे नीरव मोदीला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान त्याला केवळ नाव आणि जन्मदिनांक विचारली गेली होती.
जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गूझ यांनी लॉकडाऊनच्या काळातच पुढील महिन्यापासून “सीव्हीपी’ (कॉमन व्हुईंग प्लॅटफॉर्म)च्या माध्यमातून होणाऱ्या सुनावणीबाबत आपल्या शंकाही व्यक्त केल्या. त्यानुसार प्रत्यक्ष सुनावणीच्या आगोदर 7 मे रोजी “सीव्हीपी’ यंत्रणेच्या वापराबाबत चाचणी घेण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले. या प्रकरणातील साक्षीदार व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून पुरावे सादर करणार असल्यामुळे सुनावणीच्यावेळी निवडक वकिलच उपस्थित राहणार आहेत.
पंजाब नॅशनल बॅंकेतील मोठा आर्थिक गैरव्यवहाराबाबत सीबीआय आणि ईडी मिळून नीरव मोदीविरोधात प्रत्यार्पणाचा प्रयत्न करत आहेत. त्याशिवाय पुरावे नष्ट करणे, साक्षीदारांवर प्रभाव टाकणे किंवा मृत्यूस कारणीभूत होण्याचे आरोपही सीबीआयने नंतर लावले आहेत.
फसवणूक आणि पैशाच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली भारत सरकारने आणलेल्या प्रत्यार्पणाच्या वॉरंटवरून 19 मार्च 2019 रोजी स्कॉटलंड यार्डने नीरव मोदी याला अटक केली होती.