- उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्तेच करणार
- भाजपाच्या बालहट्टावर संजोग वाघेरे यांची टीका
पिंपरी – निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात आकाराला येत असलेला उड्डाणपूल ही अजित पवार यांचीच संकल्पना असून, राष्ट्रवादीच्या काळातच या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. इतरांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाने “आयत्या पीठावर रेगोट्या’ मारु नयेत. या पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
उड्डाणपुलाबाबत बोलताना वाघेरे म्हणाले की, निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्पासमोरील उड्डाणपुलाची संकल्पना अजित पवार यांनी मांडली होती. यानंतर स्थानिक पातळीवर आराखडा तयार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. या पुलाची तीन मजली असावी तसेच हा चौक सिग्नल फ्री करण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी स्वत: लक्ष घालून सूचना दिल्या होत्या. 27 जून 2017 रोजी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
मात्र, पालिकेत, राज्यात व देशात सत्ता असलेल्या भाजपकडून निर्धारित वेळेत पुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शहरवासीयांच्या अपेक्षांचा भंग झाला. पुलाच्या कामाची निर्धारित मुदत 26 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आली होती. वेळेत काम पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपाला आता या पुलाचे श्रेय लाटायचे असून, त्यांच्या नेत्यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचा बालहट्ट सुरू आहे, ही दुर्देवी बाब आहे.
पालिकेत भाजपची सत्ता असली तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्रीही आहेत. त्यामुळे भाजपा नेत्यांनीही पुलाचे उद्घाटन अडकवून न ठेवता अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करावे. यानंतरही स्थानिक नेत्यांनी बालहट्ट सुरूच ठेवल्यास आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने पुढाकार घेणार असून, उपमुख्यमंत्री अजित यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन केले जाईल, तसेच वाहतूकदारांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती दिली जाईल, असेही वाघेरे यावेळी स्पष्ट केले.