जगभरातील वेगवान गोलंदाजांवर रनमशीनने सिद्ध केले वर्चस्व
लाहोर – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा तो तुम्हाला सडेतोड उत्तर देईल. इतकेच नाही तर तुमच्या गोलंदाजीवर असा हल्ला करेल की त्यानंतर तुम्हाला पुन्हा कोहलीच्या वाटेला जाताना दहा वेळा विचार करावा लागेल, असा इशारा पाकिस्तानचा माजी कसोटीपटू रशिद लतिफ याने एका युट्युब वाहिनीशी बोलताना पाकिस्तानच्या गोलंदाजांना दिला आहे.
महेंद्रसिंह धोनीकडून कोहलीकडे नेतृत्व आल्यापासून तोच वारसा पुढे सुरु ठेवत कोहलीच्या संघानेही जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. खरेतर पूर्वी कोहली तापट म्हणुन बदनाम होता. त्याला मैदानावर आपल्या भावनांवर संयम ठेवताच येत नसे. मात्र, आता त्याने आपल्या स्वभावात बदल केला असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. असे असले तरीही त्याला जेव्हा कोणताही गोलंदाज डिवचतो त्यावेळी कोहली त्याचा वचपा कसा काढतो हे सगळ्या क्रिकेट विश्वाने पाहिले आहे. त्यामुळेच अन्य देशांच्या गोलंदाजांनी केलेल्या चुका तुम्ही करु नका, असा सल्लाही रशिदने
दिला आहे.
2014 साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. या मालिकेत कोहलीने दोन शतके फटकावली होती. त्यातील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने कोहलीची एकाग्रता भंग करण्यासाठी स्लेजिंग केले होते. त्यानंतर कोहलीने त्याच्याच गोलंदाजीवर सर्वाधीक धावांची बरसात केली होती. त्यामुळे कोहलीला डिवचताना आधी दहा वेळा विचार करा, असेही रशिदने सूचित केले.