मुंबई – राज्यातील कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद आज पुन्हा एकदा समोर आले आहेत. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पण या बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत हे नाराज होऊन बैठकीत उपस्थित न राहता माघारी परतले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कॉंग्रेस पक्षाची आज मुंबईच्या वांद्रे येथील एमसीएत महत्त्वाची बैठक पार पडली. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेसचे ठराविक आणि मोजकेच नेते उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत यांना या बैठकीच्या संदर्भात कळवण्यात आले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी एमसीएच्या दरवाजा समोरुन माघारी परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीवर नितीन राऊत यांनी स्वत: भूमिका मांडली आहे. नितीन राऊत म्हणाले, एच के पाटील यांच्या सदिच्छा भेटीसाठी गेलो होतो. त्यानंतर आपल्या नियोजित बैठकींसाठी मंत्रालयात आलो. त्यामुळे नाराज असल्याच्या बातम्या खोळसाळपणाच्या आहेत, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.