मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ७२,६९८ गुन्हे दाखल झाले असून १५,४३४ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख ४३ हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती गृह विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
तसेच, या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १५० घटनांची नोंद झाली असून यात ४८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत.
या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २० पोलीस अधिकारी व ८७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.