बेंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून जाहीर सभा आणि रोड शो केले जात आहे. यात भाजपनेही प्रचाराचा धुरळाच उडवला आहे. भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांत कर्नाटकात सुमारे 15 जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचारसभा 28 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर 7 मे पर्यंत मोदींचे झंझावाती दौरे राज्यभर आयोजित करण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांत 12 ते 15 जाहीर सभा, रॅली आणि रोड शो करणार आहेत. नरेंद्र मोदी हे 28 एप्रिल, 29 एप्रिल, 3 मे, 4 मे, 6 मे आणि 7 मे अशा 6 दिवसांसाठी प्रचार करणार आहेत. याच सहा दिवसांत 12 ते 15 रॅली, जाहीर सभा आणि रोड शो करतील.
भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन्ही दिग्गज नेते सध्या कर्नाटकमध्ये जाहीरसभा तसेच, रोड शो घेत आहेत. पण, भाजपसाठी मोदी हेच निवडणुकीचा चेहरा असल्याने त्यांच्या सहभागानंतर भाजपच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने गती मिळेल.
गेल्या आठवड्यामध्ये भाजपने 40 नेत्यांचा समावेश असलेल्या तारांकित प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश असून योगी बुधवारपासून कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचार सुरू करतील. योगींच्या बुधवारी तीन जाहीरसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
2017 नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ यांचा आक्रमक प्रचार आकर्षण ठरले होते. यावेळी कर्नाटकमध्ये हिजाब, हलाल यासारख्या वादग्रस्त विषयांवर अधिक भर न देण्याचे भाजपने ठरवले असल्याने योगींच्या भाषणातील मुद्दयांची उत्सुकता असेल. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करोनामुक्त झाले असून तेही बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर असतील.
दरम्यान, कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होईल. भाजपसाठी कर्नाटक राज्य दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असून इथे सत्ता राखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.