मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली? या लोकांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर थेट उत्तर दिले. आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही रोज भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे, असे मत छगन भुजबळांनी व्यक्त केले.
छगन भुजबळ म्हणाले, मी आणि माझा भाऊ आम्ही लहान होतो. त्यावेळी भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. तिथे जाऊन थोडी भाजी द्या हो म्हणत भाजीपाला गोळा करायचो आणि ती भाजी माजगावच्या घरासमोरील फुटपाथवर विकायचो.
हळूहळू व्यवसायही वाढत गेला. मी शिक्षणही करत राहिलो. भाऊ पहाटे तीन वाजता जायचा आणि मी पहाटे पाच वाजता जायचो. आरसीएफ, जॉन्सन अँड जॉन्सन अशा मोठमोठ्या कंपन्यांचे वार्षिक ठेके मगन बंधू या नावाने आम्ही दोघा भावांनी घेतले. रोज आम्ही ट्रक भरून भाजीपाला पाठवायचो, असे त्यांनी सांगितले.
भुजबळांनी सर्वोत्तम वास्तू बांधली –
भुजबळ यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधले, दिल्लीतील सर्वात उत्तम वास्तू बांधली. यासाठी एक रुपया देखील खर्च होऊ दिला नाही. भुजबळांचा आज सत्कार केला. त्यांना सत्कारावेळी फुले पगडी घातली असती तर चांगले झाले असते. भुजबळ जी कामं करतात त्यांच्या पाठिशी आपण सगळे उभे आहोत, असेही शरद पवार म्हणाले.