नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर आज काही मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनी लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी राणे यांनी पहिल्याच दिवशी आपल्या दणका दाखवत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. यामुळे दिल्लीतील सरकारी बाबूंमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
नारायण राणे आपल्या तडाखेबाज फटकेबाजीमुळे कायम चर्चेत असतात. आता राणे यांची केंद्रीय स्तरावर निवड झाली आहे. नारायण राणे यांनी आज सकाळी आपल्या मंत्रिपदाचा परभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर राणे तातडीने कामाला लागले. राणेंनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पण अधिकारी आज बैठकीला तयारी करून आले नव्हते.
त्यामुळे राणे यांनी आपल्या सर्व स्टाफला बाहेर काढून मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला. तसेच मंत्रालयात किती अधिकारी अनुपस्थित आहे याची माहिती मागितली. यावेळी जवळपास 1 तासाच्या बैठकीत 30 मिनिट अधिकाऱ्यांची राणेंनी झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उत्तर दिले. कोणतेही खातं हे छोट किंवा मोठ नसते. मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि मी जेव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचे आहे, असा टोला त्यांनी लगाविला.
शरद पवारांकडून अभिनंदन
मला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शरद पवार यांनी मला फोन केला. आणि चांगले काम करा, असा सल्ला पवारांनी दिला, असेही राणेंनी सांगितले. त्याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन एवढे मोठे नाही. मला मंत्रिपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवत निशाणा साधला.