माजी मुख्यमंत्री कमलनाथ घेणार राजकीय संन्यास?; स्वत: दिले संकेत

भोपाळ – मध्यप्रदेशात ग्रामपंचायत आणि नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. छिंदवाडा येथे आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. मला आता आराम करायचा आहे. मी आतापर्यंतच्या आयुष्यात भरपूर यश मिळवलं आहे, असं ते म्हणाले.

कमलनाथ सध्या त्यांचे चिरंजीव खासदार नकुल कमलनाथ यांच्या छिंदवाडा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. कॉंग्रेस पक्षातीलच काही नेत्यांनी त्यांच्याविरोधात टीका-टिप्पणी करण्यास सुरुवात केल्याने कमलनाथ नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत.

कमलनाथ सध्या मध्यप्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. यासोबतच ते कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला पराभव पत्कारावा लागल्यानंतर अनेक नेत्यांनी आणि आमदारांनी खुलेआम त्यांच्याविरोधात टीका केली. पक्षातीलच काही नेत्यांकडून कॉंग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

मध्यप्रदेशात आता युवा नेतृत्वाची गरज आहे, अशी भूमिका काही कॉंग्रेस नेत्यांनी घेतली. त्याचबरोबर पोटनिवडणुकीच्या पराभवाला कमलनाथ जबाबदार असल्याचा दावा काही नेत्यांनी केला आहे. कमलनाथ यांनी चांगल्या आणि सक्षम उमेदवारांना तिकीट न देता दुसऱ्याच उमेदवारांना तिकीट दिलं. त्यांची रणनीती चुकीची होती, अशी टीका कॉंग्रेसच्याच नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कमलनाथ नाराज आहेत.

मध्यप्रदेशमध्ये याआधी विधानसभा निवडणूक पार पडली तेव्हा कॉंग्रेसला बहुमत मिळालं होतं. निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय झाला होता. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन कमलमाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात मतभेद झाले. त्यावेळी कमलनाथ मुख्यमंत्री बनले, मात्र काही काळात ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. परिणामी, कमलनाथ सरकार पूर्णपणे कोसळलं. त्यानंतर आता पोटनिवडणुकीतही कांग्रेसला पराभव स्वीकारावा लागला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.