नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशातील सन 2022 साली होणारी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्या पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
आज पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना केजरीवाल यांनी सांगितले की आम्ही त्या राज्यात या आधीपासूनच संघटना बांधणीचे काम हाती घेतले असून खासदार संजय सिंह यांची उत्तर प्रदेश शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, उत्तर प्रदेशाच्या घाणेरड्या राजकीय सिस्टीममुळे आणि तेथील भ्रष्टाचारामुळे त्या राज्याचा विकास पूर्ण थांबला आहे. आम आदमी पक्षाने आता उत्तर प्रदेशात लक्ष देण्याची गरज आहे असे तेथील अनेक लोकांनी माझी भेट घेऊन मला अनेक वेळा सांगितले.
उत्तर प्रदेशातील नागरिकांना दिल्लीतील नागरिकांप्रमाणेच नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली असून तसा कार्यक्रम घेऊन आम्ही तेथील नागरिकांपुढे जाऊ असे ते म्हणाले.
अनेक छोट्याछोट्या गोष्टींसाठी उत्तर प्रदेशातील लोकांना दिल्लीत यावे लागते असे नमूद करून ते म्हणाले की लखनौच्या गोमतीनगर भागात मोहल्ला क्लिनीक त्या सरकारला का सुरू करता येऊ नये हा प्रश्न माझ्या सारख्याला सतावतो आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभर निवडणुकीपूर्वी तेथे जिल्हा परिषदांच्या निवडणूक लढवण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला.