जामखेड – तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहरी शिवारातील हाळणावर वस्ती येथे काल (सोमवार) खुनाची घटना घडली असून, मोहरी व खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत अशोक धोंडिबा हाळनावर (वय 53) यांचा चार जणांकडून खून करण्यात आला असून, यातील चारही आरोपींना खर्डा पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत आनंद अशोक हाळणावर (वय 30) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडील अशोक हे घरापासून तेलंगशी फाटा येथील शेतामध्ये दररोज जनावरे चारण्यासाठी घेऊन जात. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सकाळी 11:30 वा. सुमारास जनावरे घेऊन निघाले असता चुलत भाऊ युवराज बाबासाहेब हाळणावर याने तुम्ही शेतातून गुरे घेऊन जाऊ नका, असे म्हणून शिवीगाळ करून तुम्ही गुरे घेऊन गेला तर जीवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली.
त्या वेळी वडिलांनी तू शिवीगाळ करू नको, आपले जमिनीचे वाटप झालेले नाही, असे म्हणून वडील सामायिक पडीक शेतामधून जनावरे घेऊन जाताना युवराज हाळणावर याने हातामध्ये कुऱ्हाड घेऊन वडिलांच्या दिशेने जाताना मला दिसला. त्याच्या पाठोपाठ त्याचा भाऊ दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर हाही गेला. त्यामुळे मी त्यांच्या पाठोपाठ वडिलांकडे गेलो. त्यानंतर पुन्हा युवराज बाबासाहेब हाळणावर याने वडिलांना शिवीगाळ चालू केली.
त्याचवेळी नवनाथ हाळणावर व आप्पा हाळनावर हे वडिलांजवळ आले. त्यांनी शिवीगाळ करून त्यांच्यापैकी तिघांनी मारहाण चालू केली. युवराज हाळणावर याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने वडिलांच्या मानेवर, गळ्यावर दोन-तीन वार केले. त्यामुळे वडील जखमी होऊन खाली पडले. युवराज याने पुन्हा कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार केला.
त्या वेळी मी, तसेच चुलते बाळासाहेब हाळणावर, चुलती अनिता हाळणावर व ज्योती हाळणावर भांडणे सोडविण्याकरिता गेलो असता, वरील चौघे तेथून पळून निघून गेले. त्यानंतर वडिलांना उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेलो असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावरून आनंद हाळणावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर करत आहेत.