पुणे – लावणी कलावंत गौतमी पाटील गेल्या काही महिण्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तीच्या आडनावावरून ती चर्चेत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार चाबुकस्वार हे तीचे आडनाव असल्याचे समोर आले आहे. त्यावरून तीने पाटील हे आडनाव लावू नये असे काही जणांचे म्हणणे आहे.
मात्र यावर गौतमीने प्रतिक्रिया दिली असून आपण पाटील हेच आडनाव लावणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सोशल मीडियावर तीच्या आडनावावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अशातच शाहीर संभाजी भगत यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे संभाजी भगत यांची पोस्ट –
“नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते?? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण ….
ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे …नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये !!!
आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे!!
पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही , मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही ?? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत??
मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे , भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच ,पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्री कडे सुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात !! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्या पेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात!!
बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात!! स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच ,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धाया बाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !!”