नवी दिल्ली – राजधानीतील वाऱ्यांची दिशा बदलल्याने हवा पुन्हा एकदा खराब श्रेणीत पोहोचली आहे. या महिन्यात गुरुवारी हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद करण्यात आली. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्युआय) 220 नोंदवला गेला.
बुधवारी हाच निर्देशांक 193 होता. मागील रविवारपासून थोडासा दिलासा मिळाल्यानंतर गुरुवारी हवा खूपच खराब श्रेणीत राहिली. तर, बवानामध्ये 309 एक्युआयची नोंद झाली. ही नोंदही वाउऊ प्रदुषणाची गंभीर परिस्थिती दर्शवते.
त्याचप्रमाणे आनंद विहार, दिलशाद गार्डन, मुंडका, एनएसआयटी द्वारका, न्यू मोती बाग, बवाना, जहांगीरपुरी यासह अनेक भागात एक्युआय 200 च्या पुढे नोंदवला गेला. ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅनच्या पहिल्या टप्प्यातील निर्बंध दिल्लीत लागू आहेत.
वायू प्रदूषणाची समस्या हळूहळू गंभीर होत आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जसजसे वाढत आहे, तसतसे हवेतील प्रदूषणाचे कण आणि घनता वाढत आहे. एनसीआरच्या तुलनेत ग्रेटर नोएडानंतर दिल्लीतील हवा सर्वाधिक प्रदूषित होती.
गुरुवारी, ग्रेटर नोएडामध्ये 223 एक्युआय, गाझियाबादमध्ये 192, नोएडामध्ये 178 आणि गुरुग्राममध्ये 140 नोंदवला गेला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीनुसार, गुरुवारी वारे उत्तर-पश्चिम ते उत्तर-पूर्वेकडे वाहले.
या काळात ताशी 8 ते 10 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळेही प्रदुषित हवेचे स्तर राजधानीच्या अन्य भागात विखुरले जात होते. यामुळे श्वसनाचे विकार आणि दृष्यमानता कमी होताना दिसते आहे.