मुंबई – राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट बाहेर पडल्यानंतर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी शिंदे- भाजप सत्तांतरानंतर भुजबळांसह अनेकांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र मंत्रिपद मिळाल्याने छगन भुजबळांना “वाय प्लस’ सुरक्षा पुरविण्यात येत आहे.
नुकताच त्यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याने नाशिक शहरातील निवासस्थानाबाहेरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अजित पवार यांना बंडात साथ देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात फोनवरून सोमवारी रात्री जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी सकाळी पुणे पोलिसांनी महाडमधून एकाला ताब्यात घेतले होते.
शिंदे-भाजप सत्तास्थापनेनंतर शिंदे गटाच्या आमदारांसह खासदारांच्या सुरक्षेत जुलै 2022 मध्ये वाढ करण्यात आली होती. तेव्हा, खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांना “वाय प्लस’ सुरक्षा लागू झाली. मात्र, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची “वाय प्लस’ सुरक्षा हटवून “एक्स’ करण्यात आली होती. त्यामुळे भुजबळांना पोलिसांकडून केवळ दोन अंगरक्षक पुरविण्यात येत होते.