बंगळुरू – वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कर्नाटकमधील भाजपचे आमदार मदल विरूपक्षप्पा यांनी प्रचंड रोकड त्यांचीच असल्याचे मान्य केले. कुठल्या भ्रष्ट मार्गांनी तो पैसा जमवलेला नाही. सुपारी विक्रीतून मिळालेली ती रक्कम आहे, असा दावा त्यांनी केला.
विरूपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत बंगलोर पाणीपुरवठा मंडळात चिफ अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहे. त्याला लाच प्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या घरावर आणि कार्यालयावर टाकण्यात आलेल्या छाप्यांवेळी लोकायुक्त पोलिसांनी प्रचंड रोकड जप्त केली. त्यामुळे अडचणीत आलेले विरूपक्षप्पा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर पत्रकारांना सामोरे गेले. माझा मुलगा निर्दोष आहे. त्याला सापळ्यात अडकवण्यासाठी त्याच्या दालनात कुणीतरी 40 लाखांची रोकड ठेवली, असा आरोप त्यांनी केला.
आमचा परिसर सुपारीची भूमी म्हणून ओळखला जातो. आमच्या परिसरातील सामान्य शेतकऱ्याच्या घरातही 5 ते 6 कोटी रूपये सहजपणे आढळतील. माझी सुपारीची शेती 125 एकर इतकी आहे. माझे इतरही व्यवसाय आहेत. लोकायुक्तांकडे योग्य कागदपत्रे सादर करून मी पैसे परत घेईन, असे विरूपक्षप्पा म्हणाले.
मी काहीच गैर केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाने मला जामीन मंजूर केला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर छापा टाकण्याची घडामोड इतिहासात प्रथमच घडली आहे. माझ्या पक्षाचे नुकसान होईल असे काहीच मी केलेले नाही. कुठलाही भ्रष्टाचार मी केलेला नाही. राजकीय हेतूंनी माझ्या विरोधात कारस्थान रचले गेल्याचे वाटते, अशा शब्दांत विरूपक्षप्पा यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.