नाशिक – वय झाले हे खरं आहे. 82 झाले आहे हे खरं आहे. पण गडी काय आहे, हे पाहिलाय कुठे? अजून तर पत्ताच नाही, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांना थेट इशारा दिला. तर छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडून दिले, त्याबद्दल जाहीर सभेत त्यांनी माफी मागितली.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिलाच सभा नाशिकमधील येवला येथे पार पडली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार म्हणाले, काही जण म्हणाले, तुमचे वय झाले, तुम्ही निवृत्त व्हा. वय झाले हे खरं आहे. 82 झाले आहे हे खरं आहे. पण गडी काय आहे, हे पाहिलाय कुठे? अजून तर पत्ताच नाही. जास्त काही सांगायची गरज नाही. उगाच वयाच्या भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, पुन्हा असा विचार करू नका. धोरणात्मक टीका करा, कार्यक्रमावर टीका करा, पण वय, व्यक्तिगत भावना आम्हाला कुणी शिकवलेली नाही.
यशवंत चव्हाणांच्या विचारांचे लोक आहोत आम्ही. व्यक्तिगत हल्ले कधी झाले नाही. आमची तक्रार नाही कधी, ज्या जनतेने निवडून दिले, ज्या जनतेच्या विश्वासाला तडा दिला ती गोष्ट सहन करणार नाही. आज ना उद्या तुम्हाला याची किंमत चुकवावी लागणार आहे. या ठिकाणी खात्रीने सांगतो, असे म्हणत पवारांनी अजितदादांना चांगलंच खडसावले.
काही जणांनी सांगितले, पवारांनी नाव दिल्याने आम्ही निवडून दिले, एकदा दोनदा आणि तीन वेळा निवडून दिले. नाव कधी चुकले नाही, पण एका नावाने घोटाळा केला, त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा होता. त्यासाठी आम्ही येथे आलो आहे. कुणाचे कौतुक करण्यासाठी नाही, मी यासाठी माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज कधी चुकत नाही, येथे माझा अंदाज चुकला, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
थेट पंतप्रधानांना आव्हान –
देशाच्या पंतप्रधानांना माझे जाहीरपणे सांगणे आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल-नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेला असे तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल, असे म्हणत शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले.