नवी दिल्ली, दि.15- दोन हजार रुपयाच्या नोटांचा वापर बराच कमी झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून सरकारने दोन हजार रुपयाची एकही नोट छापलेली नाही असे अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले.
ते म्हणाले की, सध्या दोन हजार रुपयाच्या 33.62 कोटी नोटा व्यवहारात आहेत. व्यवहार करण्याच्या दृष्टीकोनातून योग्य रहावे याकरिता कोणत्या नोटा किती छापायच्या याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंकेच्या सल्ल्याने घेत असते.
2016- 17 या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई सुरू केली. त्यावेळी 35.42 कोटी इतक्या दोन हजार रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यानंतर हळूहळू या नोटांची छपाई कमी करण्यात आली.
एप्रिल 2019 पासून दोन हजार रुपयाच्या एकाही नोटेची छपाई झाली नाही. काळा पैसा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये दोन हजार रुपयाची नोट उपलब्ध करण्यात आली होती.