देहूरोड – रावेत, म्हस्के वस्ती येथे एका पंधरा मजली इमारतीचे सुरू असलेल्या बांधकामाच्या 14 व्या मजल्यावरुन एका अठरा वर्षीय तरुण मजुराचा पडून मृत्यू झाला. या प्रकरणी दोघा ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी शनिवारी (दि. 13) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन गोपाळ अलावे (वय 18, रा. रावेत पाण्याच्या टाकीजवळ, ता. हवेली, जि. पुणे) असे मयत झालेल्या मजुराचे नाव आहे. राम मोहन हांडे (वय 49, रा. हडपसर, वानवडी, पुणे) आणि लक्ष्मण गंगाधर मोरे (वय 30, रा. शिरगाव, साईबाबा मंदिराजवळ, पुणे) असे दोघा ठेकेदारांची नावे असून, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महादू विठ्ठल डामसे (वय 36, रा. रावेत पोलीस चौकी, देहूरोड) रावेत पोलीस चौकीतील पोलीस नाईक यांनी फिर्याद नोंदवली आहे.\पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेत म्हस्के वस्ती येथे सर्व्हे नंबर 97 मध्ये सोनिग्रा ऍण्ड भोसले असोसिएटचे 15 मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर सुरक्षिततेसाठी जाळी लावलेली नाही, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट, सुरक्षा बेल्ट व सुरक्षा किट असे जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपायोजना मजुरांना उपलब्ध केलेले नसताना गोपाळे हे 14 व्या मजल्यावर काम करताना पडल्याने छातीला दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विशाल जाधव तपास करीत आहे.