बुलढाणा – राज्यात महिला अत्याचाराच्या रोजच नवीन घटना समोर येत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात सुद्धा मोठी वाढ होताना दिसून येत आहे. याशिवाय अत्याचाराला कंटाळून अनेक महिलांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. अशीच एक घटना विदर्भातील बुलढाण्यातून समोर आली आहे.
येथील नवविवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेत असल्याचा एक सेल्फी सुद्धा क्लिक केल्याचं समोर आलं आहे.
मेघा वाघ अस आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच नाव आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील कठोरा येथे ही घटना घडली आहे. या विवाहितेने आत्महत्येपूर्वी गळ्यात फास अडकवून सेल्फी काढला होता. हा सेल्फी तिने आपल्या नातेवाईकांना पाठवून गळफास घेतला असं बोललं जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. जेवण बनवता येत नाही आणि केलं तर खूपच जास्त करत असते असे सासरच्या मंडळींकडून वारंवार बोलून हिणवलं जात होतं. इतकेच नाही तर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोपही मृतक महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेप्रकरणी जलंब पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे.