कराड (प्रतिनिधी) – कराड तालुक्यात पुतण्याने चुलतीवर तीन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आजारपणाच्या काळात डॉक्टर उपलब्ध करून देऊन, औषधोपचारांना मदत केल्याच्या बदल्यात पुतण्याने हे घृणास्पद कृत्य केले. त्याचबरोबर चुलतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने, पुतण्याने चुलता आणि चुलतभावाला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नराधम पुतण्यास पोलिसांनी अटक केली आहे.
कराड तालुक्यातील एका गावातील पीडित महिलेचा व्यवसाय आहे. ही महिला 2021 मध्ये आजारी पडली असता, तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होते नव्हते. त्यावेळी पुतण्याने पीडितेवरील औषधोपचारांसाठी मदत केली होती. या कारणाने पुतण्याने पीडितेशी जवळीक साधली. मी तुला वेळोवेळी मदत केली आहे. त्या बदल्यात मला काही तरी फायदा हवा आहे, असे सांगत पुतण्याने चुलतीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
सप्टेंबर 2021 ते मार्च 2024 या कालावधीत पुतण्याने तिच्यावर तीन वेळा अत्याचार केले. त्यानंतरही पुतण्याने पुन्हा शारीरिक संबंधांची मागणी केली. त्यास पीडितेने नकार दिला. त्यामुळे चुलता आणि चुलतभावाला ठार मारेन, अशी धमकी पुतण्याने चुलतीला दिली. त्याचबरोबर पुतण्याने पीडितेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.