काठमांडू – नेपाळमधील उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री गजेंद्र बहादुर हमाल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या नियुक्तीवरून वाद व्हायला लागल्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला.
विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराला 48 तास झाले नसतानाच त्यांना रीाजीनामा द्यायला लागला आहे. हमाल यांनी आपला राजीनामा पंतप्रधाने शेरबहादुर देऊबा यांच्याकडे पाठवून दिला आहे आणि पंतप्रधानांनी तो स्वीकारला आहे, असे मंत्रिमंडळाच्या सूत्रांनी सांगितले. हमाल यांच्यासह 18 मंत्र्यांचा शुक्रवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.
हमाल हे नेपाळी कॉंग्रेसचे जिल्हा पातळीवरील नेते आहेत. मात्र मुख्य न्यायाधीश चोलेंद्र शमशेर राणा यांच्या शिपारसीवरूनच त्यांना मंत्री बनवण्यात आले असल्याची टीका प्रसार माध्यमांनी सुरू केली होती. त्यामुळे त्यांच्या नुयुक्तीवरून वाद सुरू झाला होता.
हमाल यांच्या नियुक्तीवरून नेपाळ कॉंग्रेसमध्येही धुसफूस सुरू झाली होती. लोकशाही मूल्ल्यांना डावलून ही नियुक्ती झाल्याची टीका अनेक सदस्यांकडून व्हायला लागली होती.
हमाल हे नेपाळच्या संसदेच्या कनिष्ठ अथवा वरिष्ठ अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. मात्र निवड न झालेला कोणीही सदस्य सहा महिन्यांसाठी मंत्री बनू शकतो, असी राज्यघटनेत तरतूद आहे. त्यानुसार हमाल यांना मंत्री केले गेले होते. मात्र नियुक्तीला विरोद होतो आहे हे दिसल्यामुळे हमाल यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे.