पुणे -राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात “बलाबल चाचणी’ झाली असली तरी अद्यापही आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते कोणाच्या बाजूने हे स्पष्ट होत नाही. तरी आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या हक्काच्या जागांवर विपरीत राजकीय परिणाम होणार असल्याचे स्पष्ट आहे. याचा सर्वात मोठा परिणाम बारामती लोकसभा मतदार संघावरच होणार असल्याचे थेट निदर्शनास येत आहे.
मुंबईत झालेल्या मेळाव्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत कोण-कोण? याबाबतची स्थिती स्पष्ट झाल्याने यावरून आगामी काळातील राजकीय अंदाज वर्तविले जात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांचे स्थान सध्या तरी डळमळीत झाल्याचे लक्षात येत आहे. अजित पवार यांनी “भाई’ म्हणून मदत केली नाही तर आगामी 2024ची लोकसभा निवडणूक सहज जिंकणे सुळे यांना शक्य नाही. यामागील कारणेही स्पष्ट झाली आहेत. बारामती मतदार संघातील बहुतांशी आमदारांनी अजित पवार यांना पाठींबा दिला आहे.
पूर्व हवेलीतील प्रमुख पदाधिकारी हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल हे आमदार आहेत तर, भोर-मुळशीमध्ये कॉंग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदार संघातून विजयी मतांची गोळाबेरीज करणे सुळे यांच्यासाठी अवघड होऊ शकते. पुणे शहरातील खडकवासला विधानसभा मतदार संघाचा भागही बारामती मतदासंघात येतो.
परंतु, या मतदार संघात भाजपचे भिमराव तापकीर हे आमदार आहेत. तर, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची साथ सोडून अजित पवार यांना पाठींबा दिला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून नेहमीच खासदार सुळे यांना कमी मतदान झाले आहे. आता, अशा राजकीय स्थितीत मताधिक्य घटणार हे निश्चितच आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची बारामतीची जागा डळमळीत झाल्याची चर्चा आहे.
भाजपचा मार्ग मोकळा…
बारामती मतदार संघ जिंकण्यासाठी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून कोठी ताकद लावण्यात आली होती. शरद पवार यांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांचा पराभव हा महाराष्टाच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणावर परिणाम घडवून आणू शकतो, याच विचारातून सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने मोठे प्रयत्न केले. परंतु, सुळे या कमी मताधिक्याने विजयी झाल्या. आता, राष्ट्रवादीतील फुटीमुळे बारामती मतदार संघ जिंकण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.