खंडाळा -पारगांव, ता. खंडाळा ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार श्रीकांत महादेव यादव यांनी 390 मते मिळवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुरस्कृत उमेदवार संदेश गंगाराम यादव (258 मते) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत “नोटा’ला 6 मते मिळाली आहेत. त्यामुळे पारगावकरांची साथ राष्ट्रवादीलाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
गावातील वातावरण पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीशी होईल असा अंदाज होता. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी खंडाळा तहसील कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पारगांव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण शिवणकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.