औरंगाबाद- मुळात माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष नावालाच राहिला आहे, त्यामुळे त्यांना फोडण्याचा विषयच येत नाही. तर राष्ट्रवादी पक्ष ‘प्रायव्हेट कॅरियर पार्टी’ झाली आहे, असा खोचक टोला शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.
सत्तार म्हणाले की, टोपे यांचे विधान म्हणजे त्यांच्या मतदारसंघात जे घडत आहे, त्याबद्दल त्यांना आठवण झाली असावी. आमच्याकडे राष्ट्रवादी पक्ष फक्त नावालाच राहिला आहे, त्यामुळे कुणी फोडण्यासारखे राहीलच नाही. राजकारणात त्यांच्याकडे एकही पब्लिक कॅरियर नसून राष्ट्रवादी पक्ष आता प्रायव्हेट कॅरियर पार्टी झाली असल्याची खोचक टीका सत्तार यांनी यावेळी केली.
त्यामुळे शिवसेना- राष्ट्रवादीमधील राजकीय वातावरण आणखीनच तापणार असल्याची शक्यता आहे. टोपे यांनी सत्तार यांच्यासह सांदीपान भूमरे यांच्यावरही टीका केली होती. शिवसेनेचे मंत्री आपल्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याच्या आशयाचा आरोप त्यांनी केला होता.