निमोणे – शिंदोडी (ता. शिरूर) येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या फलकावर गावातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा फोटो न टाकल्याने येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला जिल्हा परिषद सदस्यांसह सर्वच नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या विकास कामांचे उद्घाटन पार पाडण्याची नामुष्की ग्रामपंचायत प्रशासनावर आल्याने शिरूर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
शिंदोडी येथे शनिवारी (दि. 16) शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या फंडातुन तयार केलेल्या रस्त्याचे उदघाटन कार्यक्रम सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब कोरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाच्या फलकावर गावातील गटबाजीमुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा फोटो टाकण्यात आला नाही. तसेच हा फलक गावातील अनेक युवकांनी सोशल मीडियावर टाकल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे गावातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा फोटो न टाकल्यानेच राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे आणि घोडगंगा कारखान्याच्या माजी संचालिका सुजाता ओव्हाळ यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ, सरपंच अरुण खेडकर, उपसरपंच राखी वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य सिंधू ओव्हाळ, गौतम गायकवाड, शिवसेनेच्या सुमन वाळूंज, माजी सरपंच इंद्रभान ओव्हाळ, माजी पोलीस पाटील बबनराव खेडकर, गंगाराम माने व मान्यवर उपस्थित होते.
बॅनरबाजीतून गटबाजीला उधाण –
सध्या शिंदोडी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. 7 पैकी 5 सदस्य भाजपाचे आहेत. आमदार अशोक पवार यांच्या फंडातून झालेल्या कामाचे उद्घाटन असताना उद्घाटनाच्या फलकावर भाजपसहीत सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे फोटो होते. परंतु त्यात ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा फोटो न टाकल्याने गावातील गटबाजीचा प्रत्यय आला. त्यामुळे निधी राष्ट्रवादीचा मात्र श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
“गावातील विविध विकासकामांच्या फलकावर ज्यांचा फोटो टाकला नाही, त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे कोणतेही मोठे पद नाही. त्यामुळे त्यांचा फोटो बॅनरवर टाकला नाही.”
– अरुण खेडकर, सरपंच शिंदोडी