अभिनेत्री नयनताराचा ‘अन्नपूर्णानी’ चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात काही जणांनी केला आहे. आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तसेच अभिनेत्री नयनतारावर एफआयआर नोंदवला आहे. शिवसेनेचे माजी नेते रमेश सोलंकी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आणि पोलिसात तक्रार दाखल केली. निर्मात्यांनी भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देतो, असेही शिवसेनेचे माजी नेते म्हणाले. त्यांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठोर कारवाई करण्याची आणि चित्रपटाच्या निर्मात्यांवर तसेच नेटफ्लिक्स इंडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एफआयआर नोंदवण्याची विनंती केली.
आपल्या तक्रारीची फोटो शेअर करताना ते म्हणाले, ‘नेटफ्लिक्स इंडिया आणि झी स्टुडिओजने जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे आणि तो प्राण प्रतिष्ठाच्या आसपास प्रदर्शित केला आहे. मी मुंबई पोलीस, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करावा. त्यांनी ‘अन्नपूर्णानी’चे दिग्दर्शक नीलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, निर्माते जतिन सेठी, आर रवींद्रन आणि पुनित गोएंका, झी स्टुडिओचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल आणि नेटफ्लिक्स इंडियाचे प्रमुख मोनिका यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. तथापि, अद्याप निर्माते आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने तक्रारीला प्रतिसाद दिलेला नाही.