नगर – पाईपलाईन रस्त्यावरील एकवीरा चौकात भाजपच्या नगरसेवकाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी अंकुश चत्तर (वय 35, रा. पद्मानगर, नगर) यांचे उपचारादरम्यान सोमवारी पहाटे निधन झाले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह सात जणांना वाशिममध्ये अटक केली. तर रविवारी सांयकाळी तोफखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत.
दि. 15 जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अंकुश चत्तर यांच्यावर लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोप व गावठी कट्टा घेऊन प्राणघातक हल्ला झाला होता. त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. घटनेनंतर आरोपींच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोना रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, भिमराज खर्से, पोकॉ बाळु खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, पोहकॉ चंद्रकांत कुसळकर, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, संदीप दरदंले, फुरकान शेख, विशाल गवांदे, पोकॉ रोहित येमुल, रविंद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ अर्जुन बडे यांची तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.
सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून (एमएच 16 सीएक्स 9393) शेवगाव, पैठण, बिडकीनमार्गे वाशिमकडे जाताना दिसून आले. पथकाने वाशिम येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. काळ्या रंगाची गाडी हॉटेल गुलाटी बाहेर उभी असलेली पथकास दिसताच त्यांनी हॉटेलमधून नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (वय 40, रा. गुरुकृपा सोसायटी, श्रमिक बालाजी चौक, नगर), अक्षय प्रल्हादराव हाके (वय 33, रा. नंदनवननगर, बंधन लॉन मागे) अभिजीत रमेश बुलाख (वय 33, रा. दिपवन अपार्टमेंट, गजराज फॅक्ट्ररी जवळ), महेश नारायण कुऱ्हे (वय 28, रा. साईनगर, वाघमळा, सावेडी), सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे (वय 25, रा. भुतकरवाडी, सावेडी) यांना ताब्यात घेतले. दुसऱ्या पथकाने मिथुन सुनील धोत्रे (वय 23, रा. पवननगर) व एका अल्पवयीन आरोपीला रांजणी (बेल्हे,ता. जुन्नर) येथून ताब्यात घेतले. तसेच तोफखाना पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. राजू फुलारी व विभ्या कांबळे अद्याप पसार आहेत.
आरोपींना 24 पर्यंत पोलीस कोठडी
तपासी अधिकारी जुबेर अहमद मुजावर यांनी सोमवारी दुपारी सहा आरोपींना न्यायालयात हजर केले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, कार, आरोपींचे कपडे हस्तगत करायचे आहेत.दोघे आरोपी पसार असून त्यांचा शोध घ्यायचा आहे. तसेच मुख्य आरोपी शिंदे व मयत चत्तर हे दोघेही राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने यात आणखी कोणत्या मोठ्या व्यक्तीचा हात आहे का, घटना घडवून आणली आहे का, याचा तपास करायचा असल्याने आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकारी मुजावर यांनी केली. मुख्य न्यायदंडाधिकारी रामकृष्ण चव्हाण यांनी आरोपींना 24 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ऍड. महेश तवले व ऍड. संजय दुशिंग यांनी काम पाहिले.
पाईपलाईन रस्त्यावरील दुकाने बंद
अंकुश चत्तर याच्या मृतदेहाचे औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी दुपारी मृतदेह पाईपलाईन रस्त्यावरील निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी चत्तर यांचा मित्रपरिवार नातेवाईक व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पाईपलाईन रस्त्यावरील जवळपास सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. उपनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी उपनगर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार
अंकुश चत्तर यांच्यावर सोमवारी दुपारी अमरधाममध्ये तणावपूर्ण व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाईपलाईन रस्त्यावरील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यात हजारोंच्या संख्येने मित्रपरिवार, कार्यकर्ते उपस्थित होते. आरोपीच्या निवासस्थानासमोरून अंतयात्रा जाणार असल्याने या ठिकाणीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आरोपींवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे
आरोपी स्वप्निल शिंदे याच्यावर नगरमध्ये तोफखाना, कोतवाली व एमआयडीसी पोलीस ठाण्यात व जालना येथील पोलीस ठाण्यात खून, खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा असे 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी अभिजीत बुलाख व महेश कुऱ्हे विरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सुरज कांबळे विरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, आर्म क्ट असे 6 गुन्हे दाखल आहेत. आरोपी मिथुन धोत्रे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.