वाल्हे (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्ह गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्या निमित्त ग्राम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या यात्रेची माहिती व वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान, नाथ साहेबाचं चांगभलं गजर करीत, गुढी पाडव्यानिमित्त आयोजित ग्राम बैठक संपन्न झाली.
गुढीपाडव्या निमित्त पहाटे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के यांच्या हस्ते ग्रामदैवत मूर्तींना दही, दूध, केळी, आंबा यांनी स्नान घालण्यात आले. पुजारी सचिन आगलावे यांनी पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी मंदिर गाभार्यात सह मंदिर परिसरात विविध फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले होते.
यावेळी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार, सरपंच अतुल गायकवाड, सचिन लंबाते, गिरिश पवार, जयवंत भुजबळ, माजी सरपंच अमोल खवले, साहेबराव पवार, सूर्यकांत पवार, पोपट पवार, विष्णू पवार, बाळासाहेब राऊत, मदन भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, दिलीप पवार, पांडुरंग भुजबळ आदींसह देवस्थान ट्रस्टचे सदस्य यात्रा कमिटी, मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे, याहीवर्षी सचिन देशपांडे यांनी पंचांग वाचन करून पीक-पाणी याविषयी माहिती देण्यात आली. सुरवातीला श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जमाखर्चाचा अहवाल सचिव शशिकांत दाते यांनी सादर केला. त्यानंतर देवाच्या यात्रेचे नियोजन तसेच, चालू वर्षाचे यात्रेतील नियोजनाची माहिती सर्व ग्रामस्थांना देण्यात आली.
यात्रेच्या काळामध्ये पाणीपुरवठा योग्य पद्धतीने करून, येणार्या पाहुण्यारावळ्यांना पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल; ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे त्या ठिकाणच्या टँकरची संख्या वाढवून यात्रेच्या काळामध्ये पाणी पुरवले जाईल.– अतुल गायकवाड, सरपंच, वाल्हे
ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन वाल्हे गावची परंपरा जपण्याचे आव्हान करीत, पुढच्या पिढीनेही, त्याचे अनुकरण करत ती परंपरा चालू ठेवावी; आपले गावचे गाव पण जपावे; जिल्ह्यात तालुक्यात एकीचा आदर्श दाखवून देऊ. श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेला कोणतेही गालबोट न लागता यात्रा उत्साहात पार पडण्यासाठी सर्व ज्येष्ठ व तरुणांनी सहकार्य करावे.- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बँक
1 मे रोजी श्रींचा विवाह सोहळा
श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा बुधवारी (दि. 1 मे) सायंकाळी 6. 34 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली.