नगर : करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वी 3 मे रोजी कडक निर्बंधांसह पूर्णत: लॉकडाऊन घोषित केले होते. मात्र, या काळात नगरकरांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रुग्णसंख्या वाढतच राहिली. आताही रुग्णसंख्या वाढीचा कहरच सुरु असल्याने कडक लॉकडाऊन येत्या 15 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी प्रशासन व पदाधिकार्यांची एकत्रित बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त प्रदीप पठारे यांच्यासह प्रमुख अधिकारी व पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
मागील 3 मे पासून नगर शहरात पूर्णत: लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. अत्यावश्यक सेवांनाही त्यात टाळे लावण्यात आले होते. हॉस्पीटल, मेडिकल व दूध वितरण तसेच बँका व पेट्रोलपंप कडक निर्बांधांसह सुरु राहतील, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले होते. त्याशिवाय शहरात सर्वच ठिकाणीर भरणारे भाजीबाजार, बाजार समितीचे मार्केटयार्ड, फळबाजार, किराणा यासह अन्य अत्यावश्यक सेवा 10 मे पर्यंत पूर्णत: बंद राहतील, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिले होते.
दरम्यान, शहरात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट होत असून, रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढच होत आहे. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कडक निर्बंधांसह लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मात्र, नगरमधील करोनाची साखळी तोडण्यात हा लॉकडाऊन पुरेसा ठरला नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा कडक निर्बंधांसह 15 मेपर्यंत आणखी पाच दिवस लॉकडाऊन असेल, अशी घोषणा महानगरपालिका आयुक्त गोरे यांनी केली आहे.
यापूर्वी 2 मे रोजीच्या मध्यरात्री बारा वाजेपासून 10 मेच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. आता त्यात वाढ झाली असून, 15 मे रोजीच्या सकाळी सातपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, असे सुधारीत आदेश काढण्यात आले आहेत. यात दूध वितरण करता येईल. मात्र, त्यासाठी देखील सकळी 7 ते 11 पर्यंतच मुभा देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.