नगर, (प्रतिनिधी) – उर्वरित आरोपी पोलिसांना का सापडत नाहीत? त्यांचा शोध घ्या, गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झालेल्या आरोपींची संपत्ती तहसीलदारांच्या मदतीने जमा करा. कोणाच्या निनावी संपत्ती असतील तर संबंधित व्यक्तीच्या खात्यावर झालेल्या संशयित व्यवहाराची माहिती घेऊन त्याही जप्त करा. त्यातून वसुली करून ठेवीदारांची देणी द्या. आरोपींना शिक्षा लागेल तेव्हा लागेल, परंतु तोपर्यंत पोलिसांनी तपासात प्रगती करून गोरगरीब ठेवीदारांची देणी देण्याला प्राधान्य द्यावे, अशी सक्त सूचनाच न्यायालयाने पोलिसांना दिली.
नगर अर्बन बँकतील गैरव्यावहार प्रकरणी अटकेत असलेला बँकेचा माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी न्यायालयाने तपासाबाबत असमाधान व्यक्त करून पोलिसांना उर्वरित आरोपी कोठे आहेत, अशी विचारणा केली. तसेच ठेवीदारांची देणी देण्यासाठी मोठे मासे गळाला लावा, त्यांच्या संपत्ती जमा करून ठेवीदारांची देणी द्या, अशी सूचना केली.
नगर अर्बन बँकेतील २९१ कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा माजी अध्यक्ष कटारिया, माजी संचालक साठे व कोठारी या तिघांना अटक केली होती. या तिघांनाही सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे.