श्रीगोंदा – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील महसूल विभागाच्या एका कार्यालयीन कर्मचाऱ्यावर लावलेला सापळा फसल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मात्र श्रीगोंद्यात सापळा लावलाच नसल्याचे सांगत हात झटकले.
याबाबत समजलेल्या चर्चेनुसार एक शासकीय प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
त्यानुसार या लाचखोर कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी आज (दि.१३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याला या प्रकाराची कुणकुण लागताच त्याने कार्यालयातून धूम ठोकल्याची चर्चा आज दुपारपासून तहसील कार्यालयाच्या आवारात रंगली होती.
या घटनेची तहसील कार्यालयातील काहींनी खासगीत कबुली दिली. दरम्यान, याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला असता आज श्रीगोंद्यात कोणताही सापळा लावला नसल्याचे त्यांनी सांगितले.