जयपूर – राजस्थानमध्ये सत्ताबदलाच्या धुमश्चक्रीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी एक मोठं विधान केलं. माझा राजीनामा 1998 पासून सोनिया गांधींकडे आहे. राज्यात मुख्यमंत्री कधी बदलेल हे कोणाला कळणार देखील नाही. हे काम एका रात्रीत होईल. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. राजस्थान राज्य सेवा परिषदेच्या राज्यस्तरीय परिषदेत गेहलोत बोलत होते.
गेहलोत पुढे म्हणाले, “माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे की सरकार किंवा मुख्यमंत्री बदलणार आहेत. परंतु तुम्ही काळजी करू नका. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून सोनिया गांधींना प्रमुख समजलं आहे. माझा राजीनामा त्यांच्याकडेच आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसनेते सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांची भेटी घोतली. त्यानंतर राजस्थानमध्ये काँग्रेस नेतृत्व बदल करणार अशी चर्चा जोरात सुरू झाली होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याऐवजी सचिन पायलट यांच्याकडे नेतृत्व सोपवणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता या चर्चेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उत्तर दिले.
आपला राजीनामा कायमस्वरूपी सोनिया गांधी यांच्याकडे ठेवल्याचे गेहलोत यांनी सांगितले. सोनिया गांधी अधिकृत आहेत, त्यांना पाहिजे तेव्हा त्या नेतृत्व बदलू शकतात. पण मला हेच सांगायचे की तुम्ही अफवांवर लक्ष देऊ नका. जेव्हा मुख्यमंत्री बदलतील तेव्हा कुणालाही कळणारही नाही.