दौंड तालुक्यातील पडवी येथील घटना
यवत- पडवी (ता. दौंड) गावच्या हद्दीतील गायकवाड मळा येथे दोन चुलत भावांमध्ये झालेल्या किरकोळ कारणावरून एका चुलतभावाने दुसऱ्या चुलतभावाच्या छातीवर चाकूने वार करत खून केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पोपट वसंत गायकवाड (वय 35) याचा गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर आरोपी खंडू उर्फ रमेश विष्णु गायकवाड (रा. गायकवाड मळा पडवी, ता. दौंड) यास यवत पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
आरोपी व मयत हे दोघे चुलतभाऊ आहेत. या दोघांमध्ये सोमवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपी खंडू गायकवाड याने पोपट गायकवाड यांच्या छातीवर धारदार चाकूने वार केले. या घटनेत पोपट गायकवाड गंभीर जखमी झाले. यानंतर जखमीला केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु पोपट गायकवाड यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
याबाबत सुर्यकांत लक्ष्मण गायकवाड यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट देत पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र घाडगे करीत आहेत.