कामशेत – मित्राचे उधार घेतलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञात स्थळी नेऊन त्याच्यावर वस्तरा व चाकूने वार करून व डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. समीर बाबू शेख (वय 17, रा. पंचशील कॉलनी कामशेत) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
सोमवारी (दि. 16) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास समीर शेख याने साहिल सादिक शेख (वय 20, रा. सहारा कॉलनी, कामशेत) यास पैसे देणे घेण्याच्या कारणावरून घरी जाऊन शिवीगाळ केली. त्यामुळे आरोपी साहिल व अल्ताफ लतिफ सय्यद (वय 20, रा. दत्त कॉलनी, कामशेत) यांनी संगनमताने समीर शेख यास मोटार सायकलवर बसवून कामशेत गावच्या हद्दीतील छत्री पॉइंटजवळील मुस्लीम दफनभूमीच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याला नेऊन त्यास वस्तरा व सुरीने वार करून तसेच दगडाने डोक्यात मारून त्यास जिवे ठार मारले. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी त्या ठिकाणी अज्ञात मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला. कामशेत पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केली आहे.