नगर – महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी 1, परिचारीका 4, लॅब टेक्निशियन 1, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 3, कनिष्ठ अभियंता (टो मोबाइल) 1, विजतंत्री 2, वायरमन 10 अशा 22 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची शिफारस प्रशासनाने महासभेकडे केली आहे. येत्या 15 सप्टेंबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून त्यात सभेत हा प्रस्ताव दिला आहे. या सभेत विकास कामाऐवजी रस्त्यांच्या नामकरणाचे विषय मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले आहेत.
चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सर्वसाधारण सभा महापौर रोहिणी शेंडगे यांनी बोलविली आहे. या सभेच्या विषयपत्रिकेत तब्बल 27 विषय घेण्यात आले आहेत. यासह वैद्यकीय प्रतिपूर्ती, कर्मचाऱ्यांच्या थकीत बिलांचे समायोजन, विविध दैनिकांची जाहिरातींची थकीत बिले, वाचनालयातील वृत्तपत्रांची थकीत बिले, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुलाचे 33 लाभार्थ्यांचे प्रस्ताव, केंद्र सरकारची पीएम बस योजना शहरात राबवणे, आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत निधीसाठी प्रस्ताव पाठवणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून कामे निश्चित करून प्रस्ताव पाठवणे, माळीवाडा वेस येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवणे आदी विविध विषयांवर निर्णय होणार आहे.
विषय पत्रिकेत कै. काकासाहेब म्हस्के कॉलेज कमान ते डॉ.आंबेडकर चौक या परिसरात लक्ष्मणराव आप्पाजी कातोरे नगर नाव देणे, चक्रधर स्वामी कमान ते मुंजोबा चौक रस्त्यास महंत वाल्हेराज महाराज बीडकर नाव देणे, गंगा उद्यान ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यास कै. बबनराव मिस्कीन रस्ता नाव देणे, प्रस्तावित आरोग्य केंद्रास डॉ. अर्जुन संतराम बोरुडे नाव देणे, तारकपूर येथील इंदिरा कॉलनीस स्व. गिरधारीलाल उर्फ लालूशेठ मध्यान नगर नाव देणे, नेता सुभाष चौक ते सीताराम सारडा विद्यालय रस्त्यास भगवान श्री जीव्हेश्वर मार्ग नाव देणे, जुनी वसंत टॉकीज चौकास माजी नगराध्यक्ष कै. शंकरराव घुले (आण्णा) चौक नाव देणे असे नामकरणाचे सात विषय घेण्यात आले आहेत.
तसेच, गोकुळनगर (भिस्तबाग, सावेडी) येथील गट क्रमांक 28/1/ब ही जागा कुस्ती केंद्र, व्यायाम शाळा, ओपन जिम करीता संभाजीराजे कुस्ती केंद्र या संस्थेस देणे, दफनभूमीसाठी समस्त मेहतर समाज, पारधी समाज व तृतियपंथी समाजास जागा देणे, रोमन कॅथेलिक दफनभूमीसाठी जागेच्या आरक्षणात बदल करणे, सावेडी स.नं. 232/1अ/1ते6, 242/1 पैकी या जागेतील महापालिकेच्या मालकीची जागा क्षेत्र 4411.50 चौमी म्हणजेच सुमारे 47 हजार चौरस फूट जागा महिला व बाल विकास भवन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासाठी देणे, भिस्तबाग स.नं. 4/1 ब 7 मधील हिस्सा नंबर 3 ची 1203.82 चौमी म्हणजे सुमारे 13 हजार चौरस फूट मिनीटी क्षेत्र लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देणे, नालेगांव येथील स.नं. 41/1, 43/1 मधील खुली जागा शहरातील माळी समाजाला देणे, नगररचना योजना क्रमांक 3 अंतिम भुखंड क्र.124 पैकी 2800 चौमी म्हणजे सुमारे 30 हजार चौरस फूट जागा जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषी हॉस्पीटलला विक्री करणे आदी जागांबाबतचे सात प्रस्ताव सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.