नाशिक – महापालिकेतील महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याला 24 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. भाऊराव काळू बच्छाव असे लाच स्वीकारताना अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो नाशिक महापालिकेत सार्वजनिक बांधकाम विभागात तांत्रिक सहायक पदावर होता. केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्याची परवानगी देण्यासाठी 25 हजारांची लाच देण्याची मागणी बच्छाव याने केली होती. तडजोडीनंतर 24 हजारांची लाच स्वीकारताना बच्छाव यांना अटक करण्यात आली.
तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांना महापालिकेच्या डांबरी रस्त्यापलीकडे केबल टाकण्याकरीता रस्ता खोदण्याची परवानगी देण्याचे मोबदल्यात 25 हजार लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सदर मागणी केलेली 24 हजार रुपयांची लाच भाऊराव बच्छाव याने पंचासमक्ष स्वीकारली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील ,पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, असई सुखदेव मुरकुटे, पोना मनोज पाटील यांनी केली. दरम्यान, कोणी सरकारी अधिकारी, कर्मचारी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.