हडपसर – पिंपरीतील रावेत परिसरात 17 एप्रिल रोजी एक भले मोठे होर्डिंग्ज पडून 5 जणांचा मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर
हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडून महंमदवाडी परिसरातील अनाधिकृत होर्डिंग्ज, बोर्ड व बॅनरवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 6 अनाधिकृत होर्डिंग्जसह 72 फ्लेक्स काढून टाकण्यात आले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.
शहरात मोठ्याप्रमाणात अनाधिकृत होर्डिंग्ज लागलेले आहेत. नुकत्याच झालेल्या वादळी पावसात त्यातील अनेक होर्डिंग्ज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. महंमदवाडीतही चार दिवसांपूर्वी एका खाजगी प्लॉटमधील होर्डिंग्ज रस्त्यावर पडले होते तर, दुसरे मोकळ्या प्लॉटवर पडले होते. सुदैवाने यामध्ये काही दुर्घटना घडली नाही मात्र, येथील वाहतूक विस्कळीत झाली होती.
आयुक्तांचा आदेश व होर्डिंग्ज पडण्याची घडलेली घटना यामुळे क्षेत्रीय कार्यालय व आकाश चिन्ह विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून परिसरात कारवाई केली. आकाश चिन्ह उपायुक्त माधव जगताप, परिमंडळ चारचे उपायुक्त संदीप कदम सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली.
“आज हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सर्व व्यावसायिक व जाहिरातदारांनी आपले नाम फलक व होर्डिंग्ज अधिकृत करून घ्यावे. तसेच, सर्व होर्डिंगधारकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. काही दुर्घटना झाल्यास संबंधित होर्डिंगधारक जबाबदार राहील.’
– प्रसाद काटकर, (सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय)