मुंबई – मुंबईमध्ये विविध गुन्ह्यांमधील तब्बल 236 वॉन्टेड आरोपींना धडक कारवाईदरम्यान अटक करण्यात आली आहे. शनिवार रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत “ऑपरेशन ऑल आऊट’ हे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते.
त्यावेळी या आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हेगार, ड्रग तस्कर आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात हे ऑपरेशन राबवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत 215 वेगवेगळ्या ठिकाणी हे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. यादरम्यान 955 गुनहेगारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 236 जण वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्यांना अटक करण्यात आली.
ड्रग्जशी संबंधित 19 प्रकरणे दाखल करण्यात आली आणि 28 ड्रग हस्तकांना पकडण्यात आले. अमली पदार्थांच्या सेवनाप्रकरणी 83 जणांवर कारवाई करण्यात आली., असे अधिकारयांनी सांगितले.
दरोड्याशी संबंधित 323 प्रकरणांची तपासणी केली गेली. त्यातील 48 शहराबाहेरच्या आरोपींना अटक केली गेली. एकूण 600 हॉटेल, लॉज आणि अन्य ठिकाणांची तपासणी केली गेली.
तर बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या 28 जणांना ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत 69 जणांना ताब्यात घेतले गेले आणि 5 हजार 927 वाहन चालकांची तपासणी केली गेली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.