मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत काही दिवसांपूर्वी केला होता.
त्यासंदर्भातील पुरावे आणि माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून राऊतांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. मला अजूनतरी नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यास माझ्याकडील पुरावे व माहिती पोलिसांना देईल, असे संजय राऊतांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चालवली जाते, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला होता. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. तर राऊतांचे आरोप बेछुट आणि खोटे असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला होता.