नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक व पक्षाचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर शनिवारी रात्री उशीरा पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला झाला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाईपलाईन रस्त्यावरील एकविरा चौकात रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह सात ते आठ जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या सिनेस्टाईल घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे, राजू फुलारी (सर्व रा. नगर) यांच्यासह अनोळखी सात ते आठ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. बाळासाहेब भानुदास सोमवंशी (वय 42, रा.वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. गावडेमळा, पाईपलाईन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास एकविरा चौक येथे अदित्य गणेश औटी याचे काही मुलांसोबत भांडण झाले. त्याने अंकुश चत्तर यांना फोन केला. ते कामात असल्याने त्यांनी चंदन ढवण याला काय झाले ते पाहण्यास सांगितले.
त्यानंतर अंकुश चत्तर हेही तेथे आले व त्यांनी भांडण मिटवले. तेथून चत्तर हे घरी जात असताना भांडणात असलेल्या राजू फुलारी याने अंकुश चत्तर यांना “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे, तुम्ही थोडावेळ थांबा’, असे म्हणून थांबवले. ते दोघे बोलत असताना दोन दुचाकींवरून काही मुले आली व त्यानंतर दोन काळ्या रंगाच्या चारचाकी गाड्या तेथे आल्या. त्यात एका गाडीमध्ये नगरसेवक स्वप्निल शिंदे बसलेला होता. गाडीतून अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे व त्यांचे 7 ते 8 साथीदार खाली उतरले व दोन्ही गाड्या निघून गेल्या. “तू स्वप्निल भाऊच्या नादी लागतोस काय? तुला स्वप्निलभाऊ काय आहे, ते दाखवतो’, असे म्हणत त्यांनी अंकुश चत्तर यांना मारहाण केली.
त्यानंतर दोन्ही गाड्या परत आल्या व त्यातून नगरसेवक स्वप्निल शिंदे हा खाली उतरत म्हणला की “याला संपवून टाका रे’. अंकुश चत्तर हे जीव वाचवण्यासाठी सिटी प्राइड हॉटेलच्या दिशेने पळत असताना तेथेच खाली पडले. त्यावेळी सुरज ऊर्फ मिक्या कांबळे याने लोखंडी रॉडने त्यांना मारले. अभिजीत बुलाखे यानेही “याला संपवून टाका, सोडू नका’, असे म्हणत अंकुश चत्तर याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. स्वप्निल शिंदे तेथे आला व “हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका व चला लवकर’, असे म्हणाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले व आरडा ओरडा करत दहशत करत गाडीतून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर अंकुश चत्तर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेमुळे दुसऱ्या दिवशीही सावेडी उपनगरात तणाव होता. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच, या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोघांना व स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.यात तिघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.