मुंबई – विधान परिषदेच्या मुंबईतील जागा आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरेश कोपरकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता आणि त्याला कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. पण आता अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे.
कोपरकर यांच्या माघारीमुळे भाजपचे राजहंस सिंग, तर शिवसेनेचे सुनील शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली जागा सोडली होती.
दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी रामदास कदम आणि भाई जगताप यांची दि. 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. यामुळे या जागेसाठी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.