राजधानी ‘काबुल’वर तोफगोळ्यांचा मारा; 8 जण ठार, 31 जखमी

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल शहरावर आज अनेक ठिकाणांहून किमान 23 तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. त्यात किमान आठ जण ठार झाले असून 31 जण जखमी झाले आहेत. दोन मोटारगाड्यांमधून हे तोफगोळे डागण्यात आले अशी माहिती अंतर्गत व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते तारीक अरियन यांनी सांगितली.

आज सकाळी झालेल्या या हल्ल्याची अजून कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाहीं. काबुलच्या ज्या वझिर अकबर खान भागात विविध देशांच्या राजदूतांची निवासस्थाने आणि कार्यालये आहेत त्या भागावरही हा हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

या हल्ल्याचे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर तालिबानने लगोलग एक निवेदन जारी करून आमचा या हल्ल्यात हात नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इस्लामीक स्टेटशी संबंधीत असलेल्या काही संघटनांकडून हा हल्ला झाला असावा असा कयास आहे.

अफगाणिस्तानातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी सध्या अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानचे प्रतिनिधी यांच्यात कतार येथे चर्चा सुरू आहे. ती चर्चा सुरू असतानाच राजधानी वर इतका उग्र हल्ला झाल्याचा प्रकार घडल्याने या मागे या चर्चेत अडथळा निर्माण करण्याचाच प्रयत्न असावा असे मानले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.