वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे थोरले चिरंजीव डोनाल्ड ट्रम्प जूनिअर यांना कोविड -19 चा संसर्ग झाला आहे. त्यांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. या आठवड्याच्या सुरुवातीलाच ट्रम्प ज्युनिअर यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ते सध्या विलगीकरणामध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे त्यांच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले.
ट्रम्प ज्युनिअर यांना जरी करोनाचा संसर्ग झालेला असला तरी त्यांना तशी कोणतीही लक्षणे दिसत नसून वैद्यकीय शिफारसींनुसार कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
स्वतः अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या समवेत फर्स्ट लेडी मेलनिया ट्रम्प आणि त्यांच्या बॅरोन या 14 वर्षांच्या मुलालाही करोनाचा संसर्ग झाला होता.
ट्रम्प यांना उपचारांसाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प ज्युनियर यांनी आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ देशभर व्यापक प्रचार केला होता. ट्रम्प ज्युनिअर यांची गर्लफ्रेंड किंबर्ली गिलफॉयललाही जुलै महिन्यात करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.