पिंपरी – मुळा (पुण्यामध्ये मुठा) नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महापालिकेबरोबर संयुक्तरित्या राबविण्यात येणार आहे. मुळा नदीचा 14.20 किलोमीटर लांबीचा प्रवाह पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. शहरातील नदीच्या लांबीनुसार त्यासाठी 750 कोटी रुपयांच्या खर्चास बुधवारी (दि. 16) स्थायी समिती सभेत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबत पुढील अंमलबजावणी करता येणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. मागील आठवड्यातील तहकूब आणि नियमित अशा दोन सभा आज झाल्या. या बैठकीत एकूण 120 विषय मंजूर करण्यात आले. त्यामध्ये 89 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक पाचमधील भोसरी-आळंदी रस्त्यावरील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथे बहुमजली वाहनतळ उभारण्यास देखील सभेत मान्यता देण्यात आली. त्यासाठी येणाऱ्या 7 कोटी 34 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
या बहुमजली वाहनतळामुळे भोसरी-आळंदी रस्त्यावरील आणि भोसरी परिसरातील वाहने पार्किंग करण्याचा प्रश्न मिटणार आहे. याचा फायदा येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी होईल. परिणामी येथील व्यावसायिकांच्या व्यवसायात आणि भोसरीतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायात देखील वाढ होणार आहे.
राहुलकुमार बजाज स्मारक उभारणार
शहराच्या औद्योगिक विकासात बजाज उद्योग समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बजाज समूहाचे माजी अध्यक्ष व माजी खासदार पद्मभुषण राहुल बजाज यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ आकुर्डी चौकात राहुलकुमार बजाज स्मारक उभारण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
माजी सैनिक विकास संघाला जागा
दिघी येथे माजी सैनिक विकास संघ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, पेन्शनर व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी काम करीत आहे. भोसरी, दिघी, बोपखेल, गणेशनगर, मोशी, चऱ्होली या परिसरात पाच हजारांहून जास्त माजी सैनिक राहत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिघी येथे शहीद कर्नल संतोष महाडीक बहुउद्देशीय भवन उभारले आहे. या इमारतीतील दुसरा व तिसरा मजला माजी सैनिक विकास संघ (दिघी) या संस्थेस पुढील पाच वर्षांसाठी वापरण्यासाठी करार करून देण्यात येणार आहे. त्यासाठीही सभेने मंजुरी दिली आहे.