बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेन्ड असल्याने आता एकापाठोपाठ एक नेत्यांचे बायोपिक यायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सिनेमे येऊन गेले आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतही केले. आता तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावरही सिनेमा येतो आहे.
भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार यश कुमार हे लालूप्रसाद यादव यांचा रोल साकारणार आहेत. सुमन कुमारची निर्मिती आणि धीरू यादवचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचे नाव “लालटेन’ (कंदिल) असणार आहे. लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे निवडणूक चिन्हही कंदिल हेच आहे. लालूप्रसाद यांची व्यक्तिरेखा हीच एखाद्या कलाकाराला आव्हान वाटावी अशी आहे.
याशिवाय त्यांच्या आयुष्यात इतक्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत की हा सिनेमा नक्कीच मनोरंजक होणार यात शंका नाही. या सिनेमात लालूप्रसाद यांच्या विद्यार्थीदशेपासून ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदापर्यंती कारकिर्द दाखवली जाणार आहे. अर्थात उत्तरार्धामधील चारा घोटाळा आणि तुरुंगवासाचा भाग सिनेमामध्ये असणार नाही.
त्यामुळे कोणत्याही राजकीय वादामध्ये हा सिनेमा अडकणार नाही. आता या सिनेमाचे शुटिंग जवळपास संपत आले आहे आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारी दरम्यान हा सिनेमा रिलीज होणार आहे.