नवी दिल्ली -निवडणूक रोख्यांचा तपशील उघड करण्यास भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) आणखी अवधी हवाय. तशी विनंती बँकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन केली आहे. संबंधित तपशील उघड करण्यासाठी एसबीआयला ३० जूनपर्यंत मुदत हवी आहे.
राजकीय पक्षांना निधी उपलब्ध करणारी निवडणूक रोखे योजना मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी आणली. ती योजना सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात घटनाबाह्य आणि रद्दबातल ठरवली.
तसेच, निवडणूक रोख्यांसंबंधीचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचा आदेश दिला. त्यासाठी एसबीआयला ६ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली. ती मुदत जवळ येऊन ठेपली असतानाच एसबीआयने सोमवारी न्यायालयात धाव घेऊन मुदतवाढीची विनंती केली.
निवडणूक रोख्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याचे त्या बँकेने नमूद केले आहे. एसबीआयच्या विनंतीवर न्यायालय काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता आहे. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने राजकीय वर्तुळाचे त्या निर्णयाकडे लक्ष असेल.