Ravi Shastri : अॅशेस मालिकेतील पराभवानंतर ‘बॅझबॉल’चा अंत जवळ; रवी शास्त्री होणार इंग्लंडचे नवे कोच?

मॅक्क्युलम आणि ‘बॅझबॉल’ अपयशी?
मे २०२२ मध्ये ब्रँडन मॅक्क्युलम यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स आणि मॅक्क्युलम यांच्या आक्रमक ‘बॅझबॉल’ शैलीने सुरुवातीला ११ पैकी १० सामने जिंकून क्रिकेट विश्वात खळबळ माजवली होती. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांसारख्या बलाढ्य संघांसमोर ही रणनीती सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. मॅक्क्युलमच्या कार्यकाळात इंग्लंडला मोठ्या कसोटी मालिका जिंकता आलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रवी शास्त्रींकडे सोपवा जबाबदारी- मोंटी पानेसर
इंग्लंडचा माजी फिरकीपटू मोंटी पानेसरने या वादात उडी घेत एक मोठे विधान केले आहे. पानेसरच्या मते, ब्रँडन मॅक्क्युलमच्या जागी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक बनवले पाहिजे. एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना पनेसर म्हणाला, “शास्त्रींकडे ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांची रणनीती इंग्लंडसाठी फायदेशीर ठरू शकते.”
हेही वाचा – Virat Kohli Santa : विराटने सांताक्लॉज बनून दिलं सरप्राइज, मुखवटा काढताच मुलांनी काय केलं? पाहा VIDEO
रवी शास्त्रींचा ऑस्ट्रेलियातील दबदबा –
रवी शास्त्री प्रशिक्षक असताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दोनदा ऐतिहासिक ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ जिंकली. २०१८-१९ मध्ये भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली, तर २०२०-२१ मध्ये अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही भारताने गाबा येथे विजय मिळवून इतिहास रचला होता. शास्त्रींचा हाच अनुभव इंग्लंडला तारू शकतो, असे पानेसरला वाटते.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहित भाई, वडापाव खाणार का?’ चाहत्याच्या ऑफरवर हिटमॅनने काय दिली रिऍक्शन? पाहा VIDEO
मॅक्क्युलमची भूमिका –
टीकेचा भडिमार होत असतानाही मॅक्क्युलम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मला या पदावर राहायचे आहे आणि चुकांमधून शिकून खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचा मी प्रयत्न करेन,” असे त्यांनी म्हटले आहे. मॅक्क्युलम यांचा करार २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे. मात्र, ईसीबी (ECB) आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





