Womens Cricketer Salary : बीसीसीआयची नवीन वर्षापूर्वी मोठी भेट! महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात तब्बल दुप्पट वाढ

BCCI Indian Womens Cricketer salary hike : बीसीसीआयने देशांतर्गत खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना नवीन वर्षापूर्वी एक शानदार भेट दिली आहे. नुकत्याच झालेल्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात (मॅच फी) मोठी वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, आता देशांतर्गत स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचे आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
जुन्या मानधनात मोठी तफावत –
आतापर्यंत देशांतर्गत स्पर्धेत महिला क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन तुलनेने कमी होते. वरिष्ठ महिला गटात अंतिम ११ मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना दिवसाला २०,००० रुपये, तर राखीव खेळाडूंना १०,००० रुपये मिळत होते. ज्युनिअर संघातील खेळाडूंना १०,००० रुपये आणि राखीव खेळाडूंना ५,००० रुपये दिले जात होते. टी-२० फॉरमॅटमध्ये ही रक्कम आणखी कमी होती. या कमी मानधनामुळे खेळाडूंच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत होता, जो आता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी वेतन संरचना –
बीसीसीआयने जाहीर केलेल्या नवीन वेतन रचनेनुसार, महिला खेळाडूंच्या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे:
| श्रेणी | जुने मानधन (प्रति दिवस) | नवीन मानधन (प्रति दिवस) |
| वरिष्ठ (Senior) – अंतिम ११ | ₹२०,००० | ₹५०,००० |
| वरिष्ठ (Senior) – राखीव | ₹१०,००० | ₹२५,००० |
| टी-२० सामने – अंतिम ११ | कमी होते | ₹२५,००० |
| ज्युनिअर – अंतिम ११ | ₹१०,००० | ₹२५,००० |
पंच आणि मॅच रेफरींच्या मानधनातही वाढ –
केवळ खेळाडूच नव्हे, तर क्रिकेट सामन्यांचे आयोजन सुरळीत पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. देशांतर्गत लीग सामन्यांसाठी पंच (Umpire) आणि मॅच रेफरींना आता दिवसाला ४०,००० रुपये मिळतील. तसेच बाद फेरीच्या (Knockout) सामन्यांसाठी ही रक्कम वाढवून दिवसाला ५०,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटमधील व्यावसायिकता वाढण्यास मदत होईल. ज्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहण्यास प्रोत्साहन मिळेल.





