IND vs BAN 2nd Test : टीम इंडियानं अशक्य ते शक्य करुन दाखवलं; कानपूर कसोटी जिंकून बांगलादेशला दिला व्हाईटवॉश…

India vs Bangladesh 2nd Test : टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत कानपूर कसोटी सामना जिंकला आहे. बांगलादेशने भारताला विजयासाठी 95 धावांचे लक्ष्य दिले होते, जे टीम इंडियाने 17.2 व्या षटकातच गाठले आणि सामना 7 विकेटने जिंकला. हा सामना जिंकून टीम इंडियाने बांगलादेशविरूध्दची दोन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.
एकप्रकारे कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या ‘निर्जीव’ कसोटीत जीव फुंकत टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवला आहे. जवळपास तीन दिवस पावसाने सामन्यात व्यत्तय आणला, त्यामुळे चाहत्यांना या सामन्याचा निकाल अनिर्णित लागेल असे वाटले होते, परंतु जो सामना अनिर्णित मानला जात होता तो रोहित ब्रिगेडने जिंकला, कारण भारतीय फलंदाजांनी कसोटीतही टी-20 शैलीत फलंदाजी केली.
अश्विन मालिकावीर तर जैस्वाल ठरला सामनावीर….
टीम इंडियासाठी यशस्वी जैस्वालने दोन्ही डावात अर्धशतके(72 आणि 51) झळकावली. त्याला या कामगिरीसाठी सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 बळी घेतले. बुमराहने दोन्ही डावात प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन हा मालिकेचा मानकरी ठरला. त्याने या मालिकेत फलंदाजीत 114 धावा केल्या तर गोलंदाजीत 11 बळी घेत भारताच्या मालिका विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
कसा झाला सामना…
पहिल्या कसोटीनंतर 27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने हस्तक्षेप केल्याने सामना एक तास उशिराने सुरू झाला. याशिवाय दुपारच्या सत्रातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळए पहिल्या दिवशी फक्त 35 षटके खेळली जाऊ शकली, ज्यामध्ये बांगलादेशने 3 बाद 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसरा दिवस पावसात पूर्णपणे वाहून गेला. यानंतर चाहत्यांना तिसऱ्या दिवशी खेळ पाहायला मिळेल, अशी आशा होती, पण तसे झाले नाही आणि तिसरा दिवसही पावसामुळे एकही चेंडू न टाकता वाया गेला.
बांगलादेशला पहिल्या डावात 233 वर रोखलं…
चौथ्या दिवशी मात्र पाऊस थांबला आणि खेळास सुरूवात झाली. बांगलादेशने 3 बाद 107 धावसंख्येवरून पुढे सुरुवात केली. चौथ्या दिवशी मैदानावर आल्यानंतर लगेचच 11 धावा करून मुशफिकुर रहीम बाद झाला, पण मोमिनुल हक दुसऱ्या टोकाकडून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. त्याने 107 धावांची नाबाद खेळी खेळली आणि आपल्या संघाला 233 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. मोमिनुल दमदार कामगिरी करत शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 194 चेंडूंचा सामना करत 107 धावा केल्या. मोमिनुलने या कालावधीत 17 चौकार आणि एक षटकार मारला. अखेर जडेजाने खालिद अहमदला शुन्यावर बाद करून बांगलादेशचा डाव संपवला आणि त्याचे 300 कसोटी बळी पूर्ण केले आणि अशाप्रकारे सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने बांगलादेशला 233 धावांवर रोखले.
भारताच्या गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर बुमराहने पहिल्या डावात भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने 18 षटकात 50 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आणि आकाश दीप यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले. याव्यतिरिक्त फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 15 षटकात 45 धावा देत 2 तर रवींद्र जडेजाने 9.2 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला.
भारताची पहिल्या डावात टी-20 शैलीसारखी फलंदाजी….
भारताने कसोटीत आक्रमक फलंदाजी करताना पहिला डाव 34.4 षटकात 9 बाद 285 धावा करत घोषित केला होता. त्यानंतर भारताकडे 52 धावांची आघाडी होती. यादरम्यान रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल टीम इंडियासाठी सलामीला आले. त्यांनी कसोटीमध्ये टी-20 सारखी फटकेबाजी केली. रोहित आणि जैस्वाल या जोडीने अवघ्या 18 चेंडूत संघाची धावसंख्या 50 पार नेली. त्यानंतर रोहित शर्मा 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. या धमाकेदार सुरुवातीनंतर, भारताचा धावांचा वेग कमी झाला नाही. भारताने अवघ्या 10.1 षटकांत 100 धावा, 18.2 षटकांत 150 धावा, 24.2 षटकांत 200 धावा व 30.1 षटकांत 250 धावांचा टप्पा गाठला. यासह कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. भारतासाठी या डावात यशस्वी जैस्वालने 51 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 72 धावा केल्या. याशिवाय केएल राहुलने 43 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार लगावत 68 धावा केल्या. तर विराट कोहलीनं 47 आणि शुबमन गिलनं 39 धावाचं योगदान दिलं. बांगलादेशकडून मेहंदी हसन आणि शकिब अल हसन यांनी सर्वाधिक 4 बळी घेतले. तर हसन महमूदला 1 यश मिळाले.
बांगलादेशचा दुसरा डावही गडगडला…
भारताने पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केल्यानंतर चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर बांगलादेशने 11 षटकांत 2 बाद 26 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशच्या संघाने मंगळवारी दोन बाद 26 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 120 धावा करताना उर्वरित आठ विकेट गमावल्या. बांगलादेशकडून शादमान इस्लामने सर्वाधिक 50 तर केल्या.
आणि पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ 146 धावांवरच गडगडला आणि भारतासमोर केवळ 95 धावांचे लक्ष्य ठेवले. या दरम्यान बांगलादेशकडून शादमान इस्लामने 101 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने सर्वाधिक 50 तर कर्णधार मुशफिकुर रहीमने 37 आणि नजमुल शांतोनं 19 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर आकाश दीपला एक विकेट मिळाली.
दुसऱ्या डावातही भारताची आक्रमक खेळी…
विजयासाठीचे 95 धावांचे छोटे लक्ष्य टीम इंडियानं 17.2 षटकात 3 बाद 98 धावा करत सहज गाठले आणि सामन्यासह मालिकेवर कब्जा केला. यादरम्यान, जैस्वालच्या बॅटमधून 45 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावांची सर्वात मोठी खेळी पाहायला मिळाली तर विराट कोहलीनं 37 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 29 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त रोहितने 8, गिलनं 6 आणि पंतने नाबाद 4 धावा केल्या. बांगलादेशकडून यादरम्यान गोलंदाजीत मेहदी हसन मिराजने 44 धावा देत 2 तर ताइजुल इस्लामनं 5.2 षटकात 36 धावा देत 1 विकेट घेतली.





