Rohit Sharma : ‘रोहित भाई, वडापाव खाणार का?’ चाहत्याच्या ऑफरवर हिटमॅनने काय दिली रिऍक्शन? पाहा VIDEO

Rohit Sharma Vadapav Video Viral : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मुळे चर्चेत आहे. तब्बल सात वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या रोहितने केवळ बॅटनेच नव्हे, तर आपल्या खिलाडूवृत्तीनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर रोहितचा एक मजेशीर व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, त्यात चाहते त्याला ‘वडापाव’ची ऑफर देताना दिसत आहेत.
मैदानावर नक्की काय घडलं?
जयपूर येथे सिक्किमविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्मा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी प्रेक्षक गॅलरीत असलेल्या एका चाहत्याने त्याला विचारले, “रोहित भाई, वडापाव खाणार का?” त्यावर दुसरा चाहता म्हणाला, “बॅगेत ठेवला आहे.” पहिल्या चाहत्याने हसत हसत पुढे म्हटले, “शाळेच्या बॅगेत आहे, इकडे बघा.” चाहत्यांच्या या मिश्किल प्रश्नावर रोहित मुळीच चिडला नाही. उलट त्याने हसत प्रेक्षकांकडे बघून हात उंचावला आणि दाद दिली. रोहितचा हा साधेपणा पाहून स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.
A fan said – Rohit bhai Vadapav khaoge kya?
Rohit Sharma said – NoBro is strictly following his diet plan 😂❤️ pic.twitter.com/IVrodC0WM3
— Tejash (@Tejashyyyyy) December 24, 2025
सात वर्षांनंतर दमदार पुनरागमन –
रोहित शर्मा २४ डिसेंबर २०२५ रोजी सात वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मैदानात उतरला. या सामन्यात तो अत्यंत फिट आणि चपळ दिसत होता. त्याने सलामीला येत सिक्किमच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने केवळ ९४ चेंडूंमध्ये १६४.८९ च्या स्ट्राईक रेटने १५५ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. यात १८ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
मुंबईचा दिमाखदार विजय –
या सामन्यात सिक्किमने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २३६ धावा केल्या होत्या. आशिष थापाने सर्वाधिक ७९ धावांचे योगदान दिले. २३७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईने रोहितच्या झंझावाती शतकाच्या जोरावर केवळ ३०.३ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पूर्ण केले. रोहितला अंगकृष रघुवंशीने (३८ धावा) मोलाची साथ दिली. या विजयामुळे मुंबईच्या संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली असून, रोहित शर्माचा फॉर्म पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.





